इतर

अकोल्यात शिवपाणंद शेतरस्त्यांसाठी व्यापक चळवळीचा निर्धार



अकोले प्रतिनिधी

: शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणाऱ्या शिवपाणंद, शिवरस्ता व शेतरस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी अकोले तालुक्यात व्यापक चळवळ उभारण्याचा निर्धार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे मुख्य प्रणेते शरद पवळे यांच्या अध्यक्षतेखाली अकोले येथील शासकीय विश्रामगृहात गणेश चतुर्थीच्या पर्वावर तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली.


बैठकीत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतरस्त्यांच्या अडचणी तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करताना आलेले अनुभव मांडले. काही ठिकाणी रस्त्यांवरील अतिक्रमणे, मोजणी व सीमांकन, रस्त्यांची नोंद आणि प्रलंबित प्रशासकीय कार्यवाही यामुळे शेतीपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


शरद पवळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत प्रत्येक प्रकरणाच्या प्रशासकीय प्रक्रियेचा आढावा घेण्याची भूमिका मांडली. “शेतरस्त्याचा प्रश्न हा कुणा एका शेतकऱ्याचा नसून संपूर्ण शेतकरी समाजाचा प्रश्न आहे. हा लढा एकत्रितपणे उभा करून प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वयातून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रलंबित प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांची समोरासमोर बैठक घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करणे, आवश्यक त्या ठिकाणी मोजणी व सीमांकन करून घेणे आणि अडथळे दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणे, याबाबत बैठकीत चर्चा झाली. तालुक्यातील शेतरस्त्यांच्या प्रश्नांचे संकलन करून त्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला.


“माझा रस्ता, माझे गाव, माझा तालुका एवढ्यापुरता हा विषय मर्यादित न ठेवता तालुक्यातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत हक्काचा रस्ता पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असा सूर बैठकीत व्यक्त झाला.
शेतरस्ता उपलब्ध झाल्यास शेतमालाची वाहतूक, शेतीची मशागत, कृषी यंत्रसामग्रीची ये-जा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. त्यामुळे अकोले तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांच्या प्रश्नाला संघटित पद्धतीने पुढे नेण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला व तालुक्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला सिमेंटचा रस्ता झाल्याशिवाय शिव पाणंदचा पदाधिकारी मागे हटणार नाही असा विश्वास महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी बोलताना सांगितले.


या बैठकीस प्रा. सहदेव चौधरी, रमेशराव राक्षे, जालिंदर बोडके, डॉ. सचिन दातीर, भाऊसाहेब सूर्यभान आमरे, ज्ञानेश्वर जगधने, बाळासाहेब भांगरे, बाळासाहेब कोटकर, अशोक रावते, माधुरी विलास वैद्य, सुरेखा नितीन शिंदे यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button