तुळजापूर हुन आलेल्या पायी ज्योतीचे स्वागत करत नेप्तीत गावात घटस्थापना!

अहिल्यानगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री क्षेत्र तुळजापूर ते नेप्ती पायी ज्योत सोहळाचे आयोजन जय भवानी प्रतिष्ठान नेप्ती यांच्या वतीने करण्यात आले होते. हे सोहळ्याचे तिसरे वर्ष असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली.
जय भवानी प्रतिष्ठानचे शेखर कांडेकर, योगेश होळकर,अभिजीत जपकर, गोविंद कर्डिले, कुमार होळकर, गणेश जपकर, समाधान जपकर, राहुल औटी सोमनाथ राऊत, वैभव मगर, नितीन येवले, विकास जपकर, वेदांत कांडेकर ,ऋषिकेश हसनाळे, सनी त्रिंबके हे ज्योत आणण्यासाठी तुळजापूर येथे गेले होते. तुळजापूर भवानी मंदिरातील ज्योत प्रज्वलन झाल्यानंतर त्या ज्योतीने ज्योत पेटवून त्यांनी नेप्ती येथे आणली . आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत तुळजापूर येथून भक्तांनी ही ज्योत आणली या ज्योतीचे महिलांनी पंचारती ओवाळून दर्शन घेतले तर ग्रामस्थांनी ज्योतीला पुष्पहार अर्पण करून फटाक्याच्या आतषबाजीत मोठ्या भक्ती भावात स्वागत केले .
तुळजापूर ते नेप्ती या पायी ज्योतीचे नेप्ती बायपास येथून डीजेच्या गजरात वाजत गाजत जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती . या मिरवणुकी निमित्त गावात घरासमोर महिलांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या . या मिरवणुकीत देवी भक्तांनी घोषणा करत भक्तीचे दर्शन घडविले .ही मिरवणूक पाहण्यासाठी लहान पासून मोठ्या पर्यंत सर्वांनी गर्दी केली होती .या मिरवणुकीची सांगता गावातील देवी मंदिराच्या पटांगणात झाली . नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून ग्रामस्थांनी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली .देवीच्या मूर्तीभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवीच्या मूर्तीचे चांगले निरीक्षण केल्यास देवी आपल्याकडे पाहत असल्याचा भास होतो. पुरोहित राजू कुलकर्णी यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीला दुध व दहीने अभिषेक घालून विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली .त्यानंतर सामुदायिक आरतीचा कार्यक्रम झाला. सर्वांच्या सहभागामुळे हा मिरवणूक सोहळा यशस्वी झाला.



